अंश आणि वृंदा The Death Before Born...
प्रिय आई-बाबा,
कसे आहात तुम्ही? आम्ही अंश आणि वृंदा बोलतोय. ओळखलं ना? नाही आम्हाला वाटलं एव्हाना विसरले असालं. अंश नाहीच म्हणत होता पण आई तुझी वृंदा तुझ्यावरच गेली आहे, अगदी तुझ्यासारखीच हट्टी..! आज आम्हा दोघांना तुमच्याकडून राहीलेल्या प्रश्नांचे उत्तरे हवी आहे. द्याल ना उत्तर?
ब्रम्ह बाबाकडून आम्ही काही मिनिटांचा अवधी घेऊन आलोय. यम काका नव्हतेच देत अनुमती आम्हाला तुमच्याशी बोलण्याची, पण सटवी आईच्या शब्दा खातर जुळून आलाय हा योग.
बाबा तुम्हीच दिला होता ना तुमच्या संकल्पनेतून आम्हा दोघांना जन्म. "अंश आणि वृंदा" तेव्हा आई पण किती आनंदी होती आम्हा दोघांना तिच्या गर्भातून जन्म द्यायला. त्यामुळे आम्ही इकडे दोघेही सतत भांडायचो कि कोण पहिले वसुंधरेवर जाईल. अंश आईचा लाडका, तर वृंदा बाबाची लाडकी होणार होती. एक छान कुटुंबाची संकल्पना बाबा नेहमी तुमच्या विचारातून झळकायची आणि तुमच्या विचारांवर आई डोळे झाकून चालायची. ते पाहून आम्ही दोघेही स्वताला खूप भाग्यवान समजायचो, की आम्ही तुमच्या सारख्या आईवडीलांच्या पोटी जन्म घेणार आहोत. बाबा तुमची लाडकी वृंदा तुमच्या अंगाखांद्यावर खेळायला तरसली आहे आणि इकडे अंश ही आईच्या कुशीत शिरण्यासाठी आसूसलाय.
ब्रम्ह बाबा सांगत होते तुमच्या दोघां बद्दल. कसे आणि कुठे तुमच्या आयुष्याची रेशीम दोर बांधली गेली, तेव्हा खरंच बाबा आईचं तुमच्या प्रतीच व तुमचं आईच्या प्रतीच प्रेम पाहून आम्हा दोघा भावंडांना तुमचा सार्थ अभिमान वाटला. अंश मला म्हणाला वृंदा बघ आपण किती भाग्यवान आहोत कि ह्यांच्या सारखे आई-बाबा आपल्याला लाभले. सटवी आई ही आमच्या जीवन-मृत्यूचा सुंदर लेखाजोखा घेऊन बसली होती. मग तिने आमचं जीवन व मृत्यू एकाच दिवशी दोनच ओळीतच का लिहीलं? सटवी आई सांगत होती तुमच्या क्षणिक जीवन मृत्यूसाठी तुमचे आईबाबाच जबाबदार आहे. सांगाना आईबाबा हे खरं आहे का? सगळं सुरळीत होत ना, तुम्ही दोघेही वाट पाहत होते ना आमच्या येण्याची. रंगवत होते ना एकमेकांच्या मिठीत आपल्या सुखी कुटुंबाचे स्वप्न आमच्या समवेत. मग कुठे माशी शिंकली सांगाना बाबा, आणि आई तु का शांत बसली आहे. आमच्या मनात हि गोष्ट कायम घर करून राहिल कि आमच्या सारख्या निष्पाप जीवांचा तुम्ही जन्मा आधीच खुन केला. आता आई काही बोलणार नाही पण बाबा तुम्ही तरी द्याना आमच्या प्रश्नाची उत्तरं, खरंच आम्हाला अजूनही तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. वाटलं तर आम्ही ब्रम्ह बाबा, सटवी आई आणि यम काकाला विनवणी करू ते ऐकेलही पण त्यासाठी तुम्ही पुन्हा एकत्र या.
अशक्य...............!
एक स्वप्न,
स्वप्नच राहिल,
जन्म तुमच्या पोटी.
तुमच्या सारखे आईबाबा,
हवे सात जन्मासाठी.
आई अंशचा श्वास,
वृंदा धडधडेल बाबासाठी.
तुमच्या कुशीची माया,
अनंत अनंत कोटी.
अंत तुम्ही अनंत तुम्ही,
बदला निर्णय आमच्यासाठी.
पुन्हा नव्याने सुरू करा,
संजिवनी संजिवीत संयोग संजोगसाठी.©तारंग.

Comments
Post a Comment